पादचारी महिलेची पर्स हिसकावल्या प्रकरणी तिघांना अटक

0
379

चाकण, दि. २० (पीसीबी) – पायी चालत जात असलेल्या महिलेचा मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना मोबाईल फोन हिसकावता आला नाही. त्यामुळे चोरट्यांनी महिलेची पर्स हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तिन्ही चोरट्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी निघोजे गावात घडली.

प्रसन्नजीत भिवाजी इंगोले, अर्जुन देवा परदेशी, अक्षय सुरेश कोळप (सर्व रा. खराबवाडी, ता. खेड) अशी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत श्रीजनी प्रभांजन घोष (वय 23, रा. चाकण. मूळ रा. कोलकत्ता) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोष गुरुवारी दुपारी टेनेको क्लीन एअर इंडिया कंपनी निघोजे येथून घरी चालत जात होत्या. चालत जात असताना त्या फोनवर बोलत जात होत्या. बजाज अलाय कंपनी चौकाकडे जात असताना दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास त्या निघोजे गावातील मर्सिडीज कंपनीच्या गेट नंबर चार समोर आल्या असता त्यांच्या मागून मोपेड दुचाकीवरून तीन चोरटे आले. एका चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना मोबाईल हिसकावता आला नाही. त्यानंतर दुस-या चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील पर्स हिसकावली. तिन्ही चोरटे दुचाकीवरून जात असताना फिर्यादी यांनी जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दुचाकीवरून जाणा-या चोरट्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. तिन्ही चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.