पवनामाई जलदिंडीचे बुधवारी प्रस्थान, मोठा प्रतिसाद

0
133

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) : शहरातून वाहणाऱ्या पवना नदी प्रदूषणमुक्तीसाठी जलदिंडी प्रतिष्ठानातर्फे बुधवारपासून पवनामाई जलदिंडी काढली जाणार आहे. निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानापासून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता दिंडीचे प्रस्थान होईल. दरम्यान, यावेळी शहरातील पर्यावरण प्रेमी, नदी विषयावर काम करणारे तज्ञ कार्यकर्ते तसेच शाळा महाविद्यालयांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे संयोजक राजीव भावसार यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे. तर, मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. नदीच्या प्रदूषणाबाबत लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात आवाज उठविला आहे. आता नदीप्रेमीदेखील आक्रमक झाले होते. मागील अकरा वर्षांपासून जलदिंडी काढली जाते. यंदाच्या दिंडीला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

पवनानगर येथे नदीपूजन करून दिंडीला प्रारंभ होईल. शिवली घाट, आर्डव घाट, थुगाव घाट, जलपूजन आणि त्यानंतर ग्रामस्थ व शाळा भेट होईल. शिवणे घाट, बेबडओहोळ किंवा सोमाटणे घाट, साळुंब्रे घाट, गुरुवारी साळुंब्रे ग्रामप्रबोधिनीमध्ये सभा, जलदिंडी आढावा घेतला जाणार आहे. साळुंब्रे घाट येथून दिंडी मार्गस्थ होणार आहे. चिंचवड येथे जलमैत्री व पर्यावरण पुरस्कार वितरण आणि दिंडीचा समारोप होणार आहे.