पंतऐवजी श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकासाठी योग्य- गावस्कर

0
795

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ६८ चेंडूंत ७१ धावा चोपून युवा फलंदाज श्रेयस अय्यर याने संघातील चौथ्या क्रमांकावर दावा ठोकला आहे. चौथ्या क्रमांकासाठी रिषभ पंतऐवजी श्रेयसच उत्तम पर्याय असून, त्याला संघात कायमस्वरुपी स्थान देण्यात यावे, असे मत टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

टीम इंडियामध्ये एका वर्षानंतर संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरनं रविवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये ६८ चेंडूंत ७१ धावांची संयमी खेळी केली. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर पंतऐवजी श्रेयसला खेळवावे असे अनेकांचे मत आहे. मात्र, संघ व्यवस्थापन सध्या चौथ्या क्रमांकावर पंतला संधी देत आहे. दुसरीकडे, रिषभ पंतऐवजी श्रेयसला चौथ्या स्थानी खेळवायला हवे आणि त्याला कायमस्वरुपी संघात स्थान द्यावे, असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. ‘पंत धोनीसारखाच उत्तम फिनिशर म्हणून कामगिरी बजावू शकतो. पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन तो आपला नैसर्गिक खेळ करू शकतो,’ असंही ते म्हणाले. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि ते ४०-४५ षटकांपर्यंत मैदानावर असतील तर, पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणे योग्य आहे. पण ३०-३५ षटकांपर्यंत फलंदाजी करायची असल्यास चौथ्या स्थानी श्रेयस आणि पाचव्या स्थानी पंतला खेळवावे, असेही त्यांनी सांगितले.

याआधी श्रेयसने पाच सामन्यांत दोन अर्धशतके ठोकली आहेत. ८८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तरीही त्याला वर्ल्डकप स्पर्धेत संघात स्थान मिळू शकले नाही. हा भूतकाळ झाला, पण आता त्याने जोरदार वापसी केली आहे. पहिल्याच सामन्यात त्याने ७१ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला अधिकाधिक संधी मिळायला हवी, असेही गावस्कर म्हणाले.