‘पंगा’नंतर कंगनाचा ‘तेजस’ उड्डाणासाठी सज्ज; साहसी एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत कंगना येतेय चाहत्यांच्या भेटीला

0
309

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : बॉलिवूडची बेधडक ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे. ‘तेजस’ चित्रपटात कंगना भारतीय वायूदलातील पायलटची भूमिका साकारत आहे. सर्वेश मेवारा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. विकी कौशलचा प्रसिद्ध सिनेमा ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचे निर्माते आता कंगनाच्या ‘तेजस’ची निर्मिती करत आहेत.

“तेजस या चित्रपटात मी एअर फोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे. देशाच्या साहसी एअरफोर्स पायलटची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असून मी या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला अभिमान आहे”, असं म्हणत कंगनाने फर्स्ट लूक पोस्ट केला. येत्या डिसेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

‘पंगा’ या तिच्या मागील चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कंगनाने आपल्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाबाबत खुलासा केला होता. तिने दिलेल्या काही मुखाखतीत तिची बालपणापासूनची एअरफोर्समध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कंगनाने या चित्रपटासाठी विशेष ट्रेनिंग घेतलं आहे. प्रोफेशनल ट्रेनरच्या हाताखाली कंगनाने एअरफोर्स पायलटच्या भूमिकेचे धडे गिरवले आहेत. ‘तेजस’च्या फर्स्ट लूकनंतर आता तिच्या चाहत्यांना ट्रेलरची प्रतीक्षा आहे.