नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यानची ‘टॉय ट्रेन’ पुन्हा सुरु करा अन् डब्बे वाढवा – खासदार श्रीरंग बारणे

0
254

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणारी ‘टॉय ट्रेन’ (छोटी रेल्वे) पुन्हा सुरु करावी. तसेच छोट्या रेल्वेच्या डब्यांची संख्याही वाढवावी अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.

याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानचा युनोस्कच्या यादीत समावेश आहे. येथे ‘टॉय ट्रेन’च्या माध्यमातून पर्यटक ये-जा करतात. सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे 21 किलो मीटरचे अंतर सुमारे 2 तास 20 मिनिटांमध्ये पार करते.

‘टॉय ट्रेन’ही सेवा पर्यटकांसह स्थानिकांसाठी एक प्रमुख साधन आहे. माथेरानमध्ये हजारो पर्यटक येतात. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस माथेरानमध्ये पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. सध्या टॉय ट्रेन शटल सेवा माथेरान ते अमन लॉजपर्यंतच चालू आहे. नेरळ आणि अमन लॉजदरम्यान सेवा चालू नाही. त्यामुळे हजारो कुटुंबाच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे.

सध्या टॉय ट्रेन शटल सेवा माथेरान ते अमन लॉजपर्यंतच चालू असल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. डब्ब्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे पर्यटकांना तिकीट मिळत नाही. पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यासाठी टॉय ट्रेन नेरळ-माथेरान-नेरळ अशी सुरु करावी. तसेच टॉय ट्रेनच्या डब्ब्यांची संख्याही वाढवावी. 8 डब्बे वाढवावेत. त्याबाबत अधिका-यांना तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.