निगडी ओटास्किम येथे हप्त्यासाठी टोळक्यांचा राडा; दुकानाची तोडफोड करुन महिलेची भाजीची हातगाडी केली पलटी

0
656

निगडी, दि. २८ (पीसीबी) – “पाच हजारांचा हप्ता दिला नाही तर तुला जीवे मारुन टाकू”, अशी दुकानदाराला धमकी देऊन दोन टोळक्यांनी दुकानाची तोडफोड केली. तसेच दुकाना शेजारील एका महिलेची भाजीची गाडी पलटी करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे पान जबरदस्ती हिसका मारुन चोरुन नेले. ही घटना बुधवारी (दि.२७) रात्री साडेसातच्या सुमारास निगडी ओटास्किम येथील राजगृह हौसिंग सोसायटीतील मंगल प्रोव्हिजन नावाच्या दुकानाजवळ घडली.

याप्रकरणी दुकानदार देवाराम शेराजी चौधरी (वय ४६, रा. राजगृह हौसिंग सोसाटी, रुम क्र.१२, ओटास्किम निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दिपरत्न उर्फ गोट्या दिलीप लोखंडे (वय २१, रा. सम्राट सोसायटी, ओटास्कीम निगडी) आणि सचिन जाधव नावाच्या दोन टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास निगडी ओटास्किम येथील राजगृह हौसिंग सोसायटीतील मंगल प्रोव्हिजन नावाच्या दुकानात आरोपी दिपरत्न आणि सचिन शिरले. त्यांनी दुकानदार देवाराम यांना “पाच हजारांचा हप्ता दिला नाही तर तुला जीवे मारुन टाकू”, अशी धमकी दिली. आणि दुकानाची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच दुकानाशेजारील एका महिलेची भाजीची गाडी पलटी करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे पान जबरदस्ती हिसका मारुन चोरुन नेले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक आरदवाड तपास करत आहेत.