मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या प्रसिद्धीसाठी मतदारांनाच मूर्ख ठरवण्याचा प्रयत्न

0
965

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – अजितदादांचे पुत्र आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी पक्षाकडून आणि त्यांच्या प्रसिद्धीचे काम पाहणाऱ्या टिमकडून खोटी माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. पनवेलमधील मोहल्ला परिसरात सभेसाठी जाताना वाहतूककोंडीमुळे उशीर झाला म्हणून पार्थ पवार रस्त्याने पळत जात असल्याचा एक व्हिडिओ गुरूवारी (दि. २८) सकाळी व्हायरल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मोहल्ला परिसरात अशी कोणतीच सभा नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या प्रसिद्धीसाठी खोटी माहिती पसरवून मतदारांना मूर्ख बनवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांच्या विजयासाठी अख्खे पवार घराण्याने पिंपरी-चिंचवडमध्ये तळ ठोकला आहे. अजितदादांपासून ते कुटुंबातील इतर सर्वजण प्रचाराच्या कामाला लागले आहेत. परंतु पार्थ पवार यांचे राजकीय कतृत्व शून्य असल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणात नकारात्मकता निर्माण झालेली आहे. त्यातच पार्थ पवार यांना लिहून दिलेले भाषण सुद्धा वाचता येत नसल्याचे स्पष्ट झाल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थितीत पार्थ पवार यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी काय पण केले जात असल्याचे समोर आले आहे.

पार्थ पवार यांच्या प्रचाराची प्रत्येक माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोचवण्यासाठी स्वतः अजितदादांनी एक प्रसिद्धीची टिम नेमल्याचे समजते. ही टिम पार्थ पवारांची दररोजच्या प्रचाराची माहिती सोशल मीडियावर टाकून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तसेच ही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होईल याचीही काळजी घेते. वाहतूककोंडीमुळे उशीर झाला म्हणून पार्थ पवार सभेच्या ठिकाणी रस्त्याने पळत जात असल्याचा एक व्हिडीओ गुरूवारी (दि. २८) सकाळी व्हायरल झाला आहे. पनवेलमधील मोहल्ला परिसरात बुधवारी (दि. २७) प्रचारासाठी जाताना पार्थ पवार रस्त्याने पळत गेल्याचे या व्हीडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची अशी कोणतीही सभा आयोजित करण्यात आली नसल्याची माहिती समोर आले आहे.

त्यामुळे हा व्हीडिओ मतदार आणि नागरिकांना भावनिक करण्यासाठी मुद्दामहून पसरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हीडिओवरून सोशल मीडियावर   नेटिझन्सनी पार्थ पवार आणि राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे. पार्थ पवार हे रस्त्यावरून पळत जात असताना कोणतीही वाहतूककोंडी दिसत नाही. मग पार्थ पवार का पळत होते?, असा प्रश्नही नेटिझन्सनी केला आहे. त्याचप्रमाणे बुधवारी (दि. २७) सकाळी पार्थ पवार हे मुंबईतील सीएमएमटीवरून पनवेलपर्यंत लोकलने प्रवास करून प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्याचे फोटो व्हायरल करण्यात आले.

प्रत्यक्षात पनवेलमधील प्रवासी सकाळी आपल्या कामानिमित्त सीएसएमटीकडे जात असतात. त्यामुळे सीएसएमटीकडून पनवेलकडे येणारी लोकल ही रिकामी असते. रिकाम्या लोकलमधून उलटा प्रवास करून पार्थ पवार यांनी प्रवाशांच्या कोणत्या समस्या जाणून घेतल्या असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत पार्थ पवार यांच्या प्रसिद्धीसाठी त्यांच्या टिमकडून आणि राष्ट्रवादीकडून काहीही केले जात असल्याचे समोर आले आहे. अशा खोट्या प्रसिद्धीतून राष्ट्रवादीला काय साध्य करायचे आहे?, असा सवाल केला जात आहे. अशा खोट्या माहितीतून मतदार मूर्ख बनतील का? हा मोठा प्रश्न आहे.