देहूरोड, खडकी कॅन्टोन्मेंटचा कचरा आता मोशी कचरा डेपोत

0
355

पिंपरी दि. ४ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड शहरातील कच-यासाठी मोशी कचरा डेपोची जागा आधीच अपुरी ठरत असताना महापालिका प्रशासनाने आता शहरालगतच्या देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कचराही मोशी कचरा डेपोत टाकण्याचा घाट घातला आहे.

देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतून गोळा केला जाणारा कचरा निगडी सेक्टर 22 येथील मोकळ्या मैदानात आणि संत तुकारामनगर येथील लष्कराच्या मोकळ्या जागेत टाकला जातो. विनाप्रक्रीया टाकल्या जाणा-या या कच-यास वारंवार आग लागते. तसेच कच-याची दुर्गंधी आणि धुर यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना अस्थमा, दमा यासारखे श्वसनाचे विकार होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत.

या गंभीर प्रश्नाबाबत महापालिका आयुक्त आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्याधिकारी यांची 2 जून 2022 रोजी बैठक पार पडली. या बैठकीत तात्पुरती उपाययोजना म्हणून देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रति दिन गोळा होणारा अंदाजे 20 ते 30 मेट्रीक टन कचरा पुढील पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मोशी कचरा डेपोत स्विकारण्याची विनंती दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांनी महापालिकेकडे केली. त्याचप्रमाणे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 10 जून 2022 रोजीच्या पत्रानुसार, त्यांनी स्वखर्चाने मोशीपर्यंत वाहतुक करून यासाठी प्रक्रीया शुल्क देण्याची तयारी दर्शविली आहे.

ही बाब लक्षात घेऊन निगडी आणि संत तुकारामनगर परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात हा कचरा मोशी कचरा डेपोत घेण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. तथापि, देहूरोड व कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. हा कचरा पिंपरी – चिंचवड शहरात व लगत टाकला जात असल्याने त्याची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने त्यांचा गोळा होणारा कचरा स्वखर्चाने वाहतूक करून मोशी कचरा डेपोत आणला जाणार आहे. या कच-यावर प्रक्रीया करण्यासाठी महापालिकेस येणा-या खर्चाच्या प्रमाणात प्रतिटन 504 रूपये शुल्क दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आकारण्यात येणार आहे.