देशात मोफत लसीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

0
327

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – कोरोनाचा मोफत डोस सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याची अत्यंत महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ७५ टक्के साठी खरेदी करून सर्व राज्यांना मोफत लस पुरविली जाणार आहे. ज्यांना मोफत लस नको असेल त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयातून मूळ किंमतीच्या फक्त १५० रुपये सेवाशुल्क देऊन लस घेता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातून करोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, पुन्हा तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे लशीच्या तुटवड्यावरून बहुतांश राज्यांमध्ये ओरड होत आहे. अनेक राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा काढल्या आहेत. मात्र, या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने आता विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं. लसीकरणासंदर्भात उपस्थित झालेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील लस उत्पादन आणि लसीकरणाच्या वेगावरही सरकारची भूमिका मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी लसीकरणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली. “करोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतची भारताची लढाई सुरूच आहे. जगातील इतर देशांप्रमाणे भारतही दुसऱ्या लाटेत मोठ्या संकटातून जात आहे. अनेकांनी आपल्या प्रिय माणसांना गमावलं आहे. शंभर वर्षानंतर ही महामारी आली आहे. इतक्या मोठ्या संकटाशी भारत अनेक आघाड्यांवर लढला आहे. रुग्णालये, उपचार सुविधा उभारण्यापासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत भारताने काम केलं. आरोग्य सुविधा उभारल्या. एप्रिल आणि मे मध्ये भारतात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती. ही मागणी पुर्ण करण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले गेले. खूप कमी वेळात ऑक्सिजनचं उत्पादन १० टक्क्यांनी वाढवण्यात आलं. जगभरातून ऑक्सिजन मागवला. याच पद्धतीने जीवनरक्षण औषधांचं उत्पादनही वाढवण्यातं आलं. रुप बदलणाऱ्या या शत्रूविरोधात मास्क, सहा फूटांचं अंतर हेच सूत्र आहे,” असं आवाहन मोदींनी केलं

“जगात लसीची मागणी होत आहे. जर आज भारतात लशींचं उत्पादन झालं नसतं, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येतं की, भारताला दशकं लागायची. पोलिओसह अनेक लशींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचा वेग ६० टक्केच होता. उत्पादनाचं प्रमाण खूप कमी होतं. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. त्याच वेगानं जर लसीकरण झालं असतं, देशाला ४० वर्ष लागले असते. पण, यासाठी सरकारनं मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे. त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झालं. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “देश संपूर्ण लसीकरणाच्या दिशेन निघालो होतो, पण करोना महामारीने आपल्याला ग्रासलं. भारतच नाही, तर जगासमोर शंका उपस्थित झाली की, भारत इतक्या मोठ्या लोकसंख्येला कसं वाचवणार. पण, निश्चय असेल तर मार्ग निघतोच. भारताने एका वर्षात दोन स्वदेशी लशी तयार केल्या. भारत लसीकरणात मागे नाही,” असंही मोदी म्हणाले.