दिवाळीत मराठ्यांच्या नव्या पक्षाची स्थापना; ५ लोकसभा आणि ५० विधानसभा लढवणार

0
2185

नाशिक, दि. २९ (पीसीबी) – आतापर्यंतच्या सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच मराठा समाजात असंतोष वाढला असून त्याला वाट करून देण्यासाठी आता नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश पाटील म्हणाले की, या पक्षाची अधिकृत घोषणा दिवाळीच्या पाडव्याला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिरात करण्यात येणार आहे. तसेच नव्या पक्षाच्या वतीने ५ लोकसभा मतदारसंघात आणि ५० विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर समविचारी पक्षांबरोबर आघाडीचाही विचार  केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  नव्या पक्षात मुख्य संघटक, कोअर कमिटी आणि जिल्हानिहाय १० पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार आहेत. त्यानंतर पक्षाची पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आमचे मार्गदर्शक  आहेत. मात्र, आमच्या नव्या पक्षाचा राष्ट्रवादीशी कोणताही संबंध नसेल. भाजपच्या काही नेत्यांशी आमचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे आम्ही भाजपच्या इशाऱ्यावर पक्ष काढत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र पक्ष  काढल्यामुळे मराठा समाजाच्या मतांमध्ये विभाजन होणार नाही. तसेच धनगर, माळी यासह इतर  समाज घटकांना निवडणुकीत सोबत घेतले जाणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.