संगमवाडीत कामाचे पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून

0
910

पुणे, दि. २९ (पीसीबी) – सुतारकामाचे पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी संगमवाडी परिसरातील बॉम्बे सॅपर्स येथील वेपन ट्रेनिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या जागेतून उघडकीस आली.

नरसिंग कुमार गर्ग (वय ३८, रा. येरवडा, मुळ. रा. राजस्थान) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुर्गेश गोस्वामी (वय २९) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग गर्ग आणि दुर्गेश गोस्वामी हे दोघेही सुतारकामाचा व्यवसाय करायचे. या सुतारकामाचे २ हजार रुपये गर्ग याने गोस्वामी याला द्यायचे होते. पण तो पैसे देत नव्हता. रविवारी गोस्वामी याने त्याच्याकडे पुन्हा पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने गोस्वामीला लोहगावहून बोलावून घेतले. रात्री दोघंही दारू प्यायले. यावेळी गर्गने त्याला १ हजार रुपये दिले. त्यानंतर दोघही घरी जात असताना संगमवाडी येथे त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला. गोस्वामी याने आणखी एक हजार रुपये दे, असे त्याला सांगितले. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळेस गर्ग जमिनीवर पडला. तेव्हा गोस्वामीने दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. या  घटनेत गर्गचा जागीच मृत्यू झाला.  त्याला ठार करुन गोस्वामी लोहगावला घरी पसार झाला.

दरम्यान, संगमवाडी येथे एकाची हत्या झाल्याची माहिती आज सकाळी विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत गोस्वामीचे घर गाठले.  गोस्वामीकडून पोलिसांनी गर्गचे पाकिट, मोबाइल जप्त केले आणि त्याला अटक केले. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.