थेरगावमध्ये रस्त्यावर कार उभी करुन महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या इसमास हटकल्याने पोलीसाची कॉलर धरुन शिवीगाळ

0
3776

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – दारुच्या नशेत रस्त्यावर कार उभी करुन त्यामध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या एका इसमाला पोलीस नाईकाने हटकल्याने त्या इसमाने पोलीस नाईकाचीच कॉलर धरुन शिवीगाळ केले. तसेच रस्त्यावरच तुम्ही बाईल का छेडता असे बोलून गोंधळ घातला. ही घटना रविवारी (दि.९) रात्री आठच्या सुमारास थेरगाव गावठान येथील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला घडली.

याप्रकरणी पोलीस नाईक अभिजीत बाळु कुंभार यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अतुल विजयकुमार गाडवे (वय ३६, रा. गुरुनानकनगर, थेरगाव, मुळ रा. काटेगाव बार्शि, जि. सोलापूर) या इसमाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि दारुंबदी कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास पोलीस नाईक अभिजीत कुंभार हे थेरगाव गावठान परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना आरोपी अतुल गाडवे हा (क्र.एमएच/१२/पीक्यु/०७७४) या क्रमांकाच्या कारमध्ये एका महिलेसोबत अश्लिल कृत्य करत असल्याचे दिसून आले. यावर अभिजीत यांनी त्यांना हटकले असता अतुल याने अभिजीत यांना आरडाओरड करुन बाईला छेडतो असे बोलून कॉलर धरुन शिवीगाळ केली. कुंभार यांनी त्याला अटक करुन थेरगाव पोलीस चौकीत आणले असता पोलीसांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन तुम्ही मला ओळखत नाही माझ्यावर ३०२, ३२६ चे गुन्हे दाखल आहेत, असे बोलून दम देण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीसांवर आरोप लावत स्वत:चे कपडे फाडले आणि भिंतीवर डोके आपटून स्वत:लाच जखमी करुन घेतले. यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपी आतुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.