तरुणाला मारहाण करून पळवली रिक्षा

0
231

पिंपळे गुरव, दि. १० (पीसीबी) – पूर्वीच्या भांडणाच्या रागातून एकाने तरुणाला मारहाण करून रिक्षा, पैशांचे पाकीट आणि कॅबची चावी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री वाजता पिंपळे गुरव येथे घडली.

सुमित गायकवाड (वय 30, रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मुमताज शेख (वय 50, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इस्साक रज्जाक शेख (वय 24) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुमताज यांचा मुलगा इस्साक याचे आरोपी सुमित याच्याशी मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यावरून सुमित याने सोमवारी रात्री आठ वाजता इस्साक याला पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीच्या गेटवरील रिक्षा स्टॅन्डवर दगडाने आणि हातोड्याने मारहाण केली. त्यानंतर इस्साक याच्याच रिक्षातून त्याला औंध रुग्णालय येथे सोडले. त्यानंतर रिक्षा, मोबाईल फोन, पैशांचे पाकीट आणि कॅबची चावी असा एकूण 22 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.