महिलेच्या दुचाकीची तोडफोड; अपहरण, विनयभंग आणि खुनाचा प्रयत्न

0
199

चिंचवड, दि.१० (पीसीबी) : महिलेच्या दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून चिंचवड, आकुर्डी, रावेत परिसरात फिरवले. दुचाकीवरून फिरवताना तिला मारहाण केली. त्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केलं. महिलेचा गळा दाबून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. रात्रभर महिलेला हॉटेलमध्ये डांबून ठेवले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 9) सकाळी उघडकीस आला असून याबाबत दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिरोज बबलू शेख (वय 20, रा. बंडगार्डन रोड, कॅम्प पुणे), संकेत दारवडकर (वय 20, रा. बंडगार्डन रोड, कॅम्प पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 32 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास चिंचवड मधील लोकमान्य हॉस्पिटलजवळ महिलेला अडवले. तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. तिच्या दुचाकीची तोडफोड करून तिचे नुकसान केले. आरोपी फिरोज याने त्याच्या करिझ्मा दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तिला चिंचवड, खंडोबा माळ चौक आणि रावेत या परिसरात फिरवले. प्रवासादरम्यान फिरोज याने महिलेच्या तोंडावर, छातीवर, पोटावर हाताच्या कोपऱ्याने मारले. त्यानंतर आरोपींनी महिलेला पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या लकी हॉटेलमध्ये एका रूमवर नेले. तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. महिलेने आरोपीला विरोध केला असता फिरोज याने ‘मी आता तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत महिलेचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत महिलेला हॉटेलच्या रूममध्ये डांबून ठेवले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.