…तरच मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ- एकनाथ खडसे

0
1516

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर त्यांच्या सुरात सुर ओढत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास तरच मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ, असे म्हटले आहे.

भाजपच्या दोन्ही नेत्यांच्या या विधानावरुन मराठा आरक्षण कसे लागू होणार ? याबाबत दोन्ही नेत्यांना कल्पना नसल्याचे दिसते. दरम्यान आज सकाळी  मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीला पंकजा  सदस्य नसतानाही त्या या बैठकीला हजर होत्या. कुणबी समाजाला वगळून मराठा समाजाला जनसंख्येनुसार आरक्षण द्यावे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावरुन वाद झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळ बैठकीतून नाराज होऊन  बाहेर पडल्याचे वृत्त आले होते.

दरम्यान, मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात आज सादर केले जाणार आहे. मराठा समाजाने आरक्षणाची मागणी दीर्घकाळ लावून धरली असून ती आता पूर्ण होणार आहे. अनेक कायदेशीर अडथळे पार करून मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात सादर केले जाईल. अधिवेशन संपण्याआधी विधेयक मांडू आणि कायदा आणू, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.