धडक कारवाई : देहुरोडमधील ३३ सराईत गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीसांनी घेतले ताब्यात

0
1850

देहुरोड, दि. २९ (पीसीबी) – गुन्हेगारी कारवायांमध्ये देहुरोड परिसर हिट लीस्टवर असून बहुतांश गुन्हेगार हे देहुरोड परिसरातील आहेत. या गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलिसांनी आज (गुरुवार) पहाटेच देहुरोड परिसरातील तब्बल ३३ रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी कोम्बींग ऑपरेशन करुन ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या ३३ आरोपींविरोधात चोरी, मारामारी, खूनाचा प्रयत्न, तस्करी, घातक हत्यार बाळगणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड परिसरातील वाढत चालेली गुन्हेगारी कमी व्हावी तसेच तेथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसावा यासाठी आज पहाटे देहूरोड परिसरातील गांधीनगर आणि आंबेडकरनगरमध्ये पोलिसांची विविध पथके तयार करुन कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान परिसरातील तब्बल ३३ सराईत गुन्हेगार पोलीसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीसांच्या या धडक कारवाईमुळे शहरपरिसरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून काही गुन्हेगारांनी पलायन करायला सुरुवात केली असल्याचे समजते.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन, खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि देहूरोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या पथकाने केली.