डॉ. पायल यांचा तिन्ही डॉक्टरांकडून छळ?

0
580

मुंबई, दि.८ (पीसीबी) – डॉ. पायल तडवीप्रकरणी चौकशी अहवाल राज्यस्तरीय समितीने सरकारला सादर केला असून डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. भक्ती मेहेर यांनी डॉ. पायल यांचा छळ केल्याचा निष्कर्ष यात काढण्यात आला असल्याचे समजते.  हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठालाही पाठविण्यात आलेला आहे.

डॉ. पायल यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने नायर रुग्णालय प्रशासनासह, डॉ. पायलचे सहकारी, रुग्णालयातील कर्मचारी, प्राध्यापक आणि तिचे नातेवाईक अशा जवळपास ५० जणांचे जबाब नोंदविले आहेत. यामध्ये आरोपींच्या पालकांचे जबाबही नोंद केले आहेत. या सर्व जबाबांची चित्रफित केली आहे.

जबाबांची पुस्तिका, सीडी आणि अहवालाची प्रत वैद्यकीय शिक्षण विभाग आणि राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पाठविलेली आहे. डॉ. पायल यांचा छळ झाल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आल्याचे समजते, मात्र त्याबाबत तिन्ही महिला डॉक्टरांवर कोणती कारवाई करावी याबाबत मात्र अहवालात अस्पष्टता ठेवल्याचे समजते.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची शनिवारी भेट

डॉ. पायल तडवी प्रकरणाची दखल राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानेही घेतली आहे. आयोगाचे आयुक्त नंदकुमार साय हे शनिवारी नायर रुग्णालयासह आरोग्य विभागाचे मुख्य सचिव, सचिव आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. आयोगाने आम्हाला भेटीसाठी बोलावलेले नाही, मात्र तरीही आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी आयोगाची भेट घेणार असल्याचे डॉ. पायलच्या आई आबेदा तडवी यांनी सांगितले.राज्य आणि राष्ट्रीय आयोगाचे कामकाज पूर्णपणे वेगळे आहे. या भेटीबाबत कोणतीही सूचना न आल्याची माहिती राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य आणि न्यायाधीश सी.एल.थूल यांनी दिली.

लेखी तक्रार केलीच नाही!

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणाचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीत सादर केला. रुग्णालयात होणाऱ्या त्रासाची डॉ. पायल यांनी कोणतीही लेखी तक्रार दिली नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने केले आहे.  डॉ. पायल आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद २४ मेच्या स्थायी समितीत उमटले होते. या बैठकीत डॉ. पायल यांच्या आत्महत्येबाबत स्पष्टीकरण करण्याचा आग्रह सर्वपक्षीय सदस्यांनी धरला होता. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (सामान्य प्रशासन) व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या स्वाक्षरीचा अहवाल शुक्रवारी स्थायी समितीत अहवाल सादर करण्यात आला. डॉ. पायल किंवा त्यांच्या नातेवाईकांनी नायर रुग्णालयाच्या कार्यालयात कोणतीही लेखी तक्रार केलेली नसल्याचे या अहवालात नमूद केले आहे. पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून यात अनुसूचित जमातीच्या एका सदस्याची नेमणूक करण्यात आली आहे. याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश या अहवालामध्ये देण्यात आले आहेत.

आरोपींच्या जबाबांची नव्याने नोंद

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेतील तिन्ही महिला डॉक्टरांचे जबाब गुन्हे शाखेने शुक्रवारी नव्याने नोंदवून घेतले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत गुन्हे शाखा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत आरोपी महिलांकडे चौकशी करू शकणार आहे. त्यानुसार शुक्रवारी भायखळा येथील महिला कारागृहातून डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा यांना नागपाडा येथील सहायक आयुक्त कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.

विभागप्रमुख डॉ. शिरोडकर यांची बदली

डॉ. पायल तडवी यांनी तक्रार केल्यानंतरही याबाबत रुग्णालय प्रशासनाला कोणतीही माहिती न दिल्याचा ठपका ठेवीत नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. स्नेहा शिरोडकर यांची पालिकेने बदली केली आहे. त्यांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस पालिकेने बजावली होती. कूपर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागामध्ये त्यांना पाठविण्यात आले आहे. डॉ. पायलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असणाऱ्या तिन्ही डॉक्टरांसह युनिटप्रमुख डॉ. चिंगलिंग यांना पालिकेने निलंबित केले आहे.

सोमवारी निषेध मोर्चा

डॉ. पायल यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलेल्या आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करत विविध संघटनांनी निषेध मोर्चाचे आयोजन सोमवारी १० जून रोजी केले आहे. मुंबई विद्यापीठ ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने जाणाऱ्या या मोर्चामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती इत्यादी संघटना सहभागी होणार आहेत.