डोनाल्ड ट्रम्प यांचा वर्किंग व्हिसासंबंधी मोठा निर्णय; अमेरिकेचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांची चिंता वाढवली

0
332

अमेरिका, दि.०१ (पीसीबी) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांची चिंता वाढवली आहे. गुरुवारी स्लथांतर बंदीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ज्यामुळे अनेक “ग्रीन कार्ड” अर्जदार आणि तात्पुरते अमेरिकेत येणाऱ्या परदेशी कामगारांना देशात प्रवेश करण्यात अडथळा होणार असून करोना संकटात स्वदेशी लोकांचे उर्वरित रोजगार वाचवण्यासाठी स्थलांतरबंदी लागू करण्याचा मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिलं आहे.

३१ डिसेंबरला ही बंदी संपुष्टात येणार होती. पण आता ही बंदी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रम्प सरकारच्या परदेशी कामगारांवर बंदीच्या निर्णयाचा अनेक उद्योजकांनी जाहीरपणे विरोध केला होता. एप्रिल आणि जून महिन्यात स्थलांतरबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी लवकरच स्वीकारणारे जो बायडन यांनी या बंदीच्या निर्णयाचा विरोध केला होता. पण सत्तेत आल्यानंतर निर्णय बदलण्याबद्दल त्यांनी अद्यापही कोणतंही भाष्य केलेलं नाही.

दरवर्षी मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक अमेरिकेत नोकरीसाठी येतात. त्यांना एच १ बी आणि अन्य वर्क व्हिसा दिले जातात. तेच व्हिसा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. सतत नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेण्याची अमेरिकेची कल्पकता आणि स्पर्धात्मक वातावरण याला दुहेरी फटका बसेल असा इशारा या आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांनी दिला होता. पण आता याचा कार्यकाळ अजून तीन महिने वाढवण्यात आला आहे.