कोहली, स्मिथच्या साथीत खेळायला मिळणे हे भाग्य

0
180

नवी दिल्ली, दि. 1 (पीसीबी) : भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे क्रिकेट विश्वातील महान फलंदाज आहेत आणि त्यांच्या साथीत खेळायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने व्यक्त केली. वर्षाच्या अखेरीस आयसीसीच्या क्रमवारीत केन विल्यम्सन याने कोहली आणि स्मिथ यांना मागे टाकून फलंदाजांमध्ये पहिले स्थान पटकावले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केलेली शतकी खेळी त्याच्यासाठी महत्वाची ठरली. केन विल्यम्सन म्हणाला,’तुम्हाला जेवढे संघासाठी प्रयत्न करता येतील तेवढे तुम्ही करता तेच मी केले. त्याचे प्रतिबिंब फक्त मानांकनाच्या रुपाने समोर आले.

विल्यम्सनने यापूर्वी २०१५ मध्ये अव्वल स्थान पटकावले होते. पण, ते तेवढ्यापुरते ठरले होते. तेव्हापासून कधी स्मिथ, तर कधी कोहली यांच्यातच अव्वल स्थान विभागले जात होते. या वर्षी देखील काही वेगळे नव्हते. स्मिथ सतत आघाडीवर होता, तर कोहली सातत्याने त्याला गाठण्याचा प्रयत्न करत होता. वर्षाच्या अखेरच्या कसोटी सामन्यापर्यंत दोघांच्या गुणातील फरक फक्त ५१ गुणांचा होता. मात्र, या कसोटीत कोहली खेळलाच नाही, तर स्मिथ पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा विल्यम्सन दोघांना मागे टाकून पुढे गेला.

कोहली आणि स्मिथविषयी बोलताना विल्यम्सन म्हणाला,’ खरंच दोघे महान फलंदाज आहेत. कोण श्रेष्ठ हे ठरवताच येत नाही. तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये गेली अनेक वर्षे ते आपली छाप पाडतच आहेत. त्यांच्याविरुद्ध खेळायला मिळणे हे मी भाग्यच मानतो.’

पाकिस्तानविरुद्धच्या विजयाविषयी विल्यम्सन म्हणाला,’पाकिस्तानने अखेरपर्यंत प्रतिकार केला. विजयासाठी दोघांनी प्रयत्न केले. पण, अखेरची २५ मिनिटे आमची राहिली. विजय मिळविणे खरंच आनंदी होते. जागतिक कसोटी अजिंक्यपद लढतीत खेळण्यासाठीची संधी साधायचा आम्ही प्रयत्न करू.’

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यांच्यासाठी जागतिक अजिंक्यपद मालिकेसाठी ही अखेरची संधी असेल. भारताला अजून दोन सामने खेळायचे आहेत. मात्र, त्यांना यातील एकही सामना हरता येणार नाही. सामना ड्रॉ राहणे भारताच्या पथ्यावर राहणार आहे.