जो कोणी राफेलची चौकशी करेल, त्याला संपवलं जाईल; राहुल गांधींचा मोदींवर आरोप

0
520

जयपूर, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान मोदी यांचा सीबीआय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यामागे हात आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल करारातील  घोटाळ्याबाबत चौकशी करत होते, त्यामुळेच त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) केला.

राजस्थानातील झालावाड येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काल रात्री देशाच्या चौकीदाराने सीबीआयच्या संचालकांना पदावरून दूर केले, कारण ते राफेल घोटाळ्याची चौकशी करत होते. त्याचबरोबर सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे राफेल घोटाळ्याबाबतची कागदपत्रे गोळा करत होते. त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. जो कोणी राफेलची चौकशी करेल, त्याला संपवलं जाईल, असा थेट इशाराच मोदींनी दिल्याचा आरोप करून देशाची राज्यघटना संकटात आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी वसुंधरा राजे यांच्या मुलाला कोट्यावधी रूपये दिल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच परदेशात पळून जाण्यापूर्वी विजय मल्ल्या केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटला होता, असा पुनरूच्चार राहुल यांनी केला. दरम्यान राहुल गांधी राजस्थान विधान सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानाच्या दौऱ्यावर आहेत.  या दौऱ्यात त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.