पुण्यात कोर्टाच्या आवारात वकीलांनी केला आरोपीवर हल्ला

0
2154

पुणे, दि. २४ (पीसीबी) –  वकील देवानंद ढोकणे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या अंगावर वकिलांचा जमाव धावून गेल्याने काही काळ न्यायालयाबाहेर तणाव निर्माण झाला. ही घटना आज (बुधवार) दुपारच्या सुमारास  पुणे न्यायालयाच्या परिसरात घडली.

वकिलांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे पोलिसांचीही काहीकाळ भंबेरी उडाली होती. मात्र, त्यांनी आरोपीला सुरक्षितपणे वाहनापर्यंत नेले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीचे हक्क अबाधीत ठेऊन २ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमब्रीज येथे सोमवारी (दि.२२) रात्री पावणेनऊ वाजण्याचे सुमारास कारमधून भाऊ बाळासाहेब ढोकणे यांचा सोबत घरी जात असलेले अॅड.देवानंद रत्नाकर ढोकणे (वय-४२, रा.येरवडा,पुणे) यांच्यावर दोघांनी गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कुरमादास काळूराम बढे (वय-३२, रा.कलूस,ता.खेड) यास अटक केली.तर त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. बढे हा अॅड.ढोकणे यांचा पक्षकार असून त्याने एका खटल्याकरिता दिलेले दोन लाख रुपये अॅड.ढोकणे यांनी परत न केल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.