चिखली, चऱ्होली , डुडुळगाव, दिघी, मोशी, बोपखेल करांचा पाणी प्रश्न महिनाभरात निकाली

0
322

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – भामा आसखेड धरणातून पिंपरी – चिंचवड महापालिका १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलणार आहे. अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर, निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकवेल) काम पूर्ण झाले असून वीज जोडणीचे काम सुरु आहे. लवकरच त्याची ‘ट्रायल’ घेतली जाणार असून ऑक्टोबर अखेरपर्यंत समाविष्ट भागातील गावांना पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे. भूसंपादन झालेल्या जागेत जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पंपिंग, पाणी तपासणी प्रयोगशाळा, जॅकवेल, फिल्टर वेल यांसारखी महत्त्वाची प्राथमिक कामे पुर्णत्वाकडे पोहोचली असून महिनाभरात ही कामे दृष्टिक्षेपात येतील. पहिल्या टप्प्यामध्ये ५० ते ६० एमएलडी पाण्याचा नागरिकांना पुरवठा केला जाणार आहे. या मुळे पाणीसमस्येचर दाहकता कमी होण्यास मदत होणार आहे.

आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलण्याची परवानगी पिंपरी – चिंचवड महापालिकेला मिळाली आहे. पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी उचलण्यात येणार असून त्यासाठी बंदिस्त जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह पत्रकारांनी बुधवारी (दि.२१) केली. निघोजेतील अशुद्ध जलउपसा केंद्र, चिखलीतील जलशुद्धीकरण वेंâद्राला भेट दिली. सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता चंद्रकांत मुठाळ, ‘डीआरए कन्सल्टंट’ कंपनीचे संदीप पुरोहित, शीतल पवार यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.

शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणणार आहे. त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखलीत अडिच एकर जागेवर ३०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. सध्या १०० एमएलडी पाणी महापालिकेला उपलब्ध झाले असले तरी भविष्यकालीन तरतूद म्हणून ३०० एमएलडी पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला जात आहे. किमान ५० एमएलडी पाणी पुढील महिनाभरात उपलब्ध होईल असा विश्वास उपअभियंता चंद्रकांत मुठाळ यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाचा फायदा चिखली, चऱ्होली , वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव, दिघी, मोशी, बोपखेल आदी परिसरातील रहिवाशांसाठी होईल. या परिसराला पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो. या कामाचा खर्च ४६ कोटी ४८ लाख असून आतापर्यंत ४१ कोटी रुपये खर्ची झाले आहेत. गोंडवाना इंजिनिअर्स लिमिटेड वंâपनीला या कामचा ठेका देण्यात आला आहे.

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आंद्रा धरणातून सुरुवातीला १०० एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. आंदातून इंद्रायणी नदीत सोडलेले पाणी उचलण्यासाठी महापालिकेने निघोजे येथे अशुद्ध जलपसा केंद्र उभारले आहे. प्रोसेसिंग युनिटचे काम पूर्ण झाले आहे. निघोजेतून १२०० मिली मीटर व्यासाच्या जलवाहिनीतून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार आहे. हे अंतर साडेपाच किलोमीटर आहे. चिखलीत पाणी शुद्ध होऊन स्पाईन रोड येथील जलकुंभात (टाक्या) पाणी सोडले जाईल. त्यातून समाविष्ट भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. सुरुवातीला ५० ते ६० एमएलडी पाणी पुरवठा होईल. त्यानंतर पावसाळ्यातील चार महिने इंद्रायणीतून पाणी उचलण्याचे नियोजन आहे.

नवलाख उंब्रे येथे ‘बीपीटी’ उभारणार !
आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे नवलाख उंब्रे येथे पाणी आणण्यात येणार आहे. महापालिका या ठिकाणी ‘एमआयडीसी’च्या १ हेक्टर जागेवर ब्रेक प्रेशर टँक (बीपीटी) उभारणार आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामागील जागा महापालिकेला देण्यास एमआयडीसीने तत्वत: मान्यता दिली आहे. नवलाख उंब्रे येथून जलवाहिनीने चिखली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार आहे. हे अंतर २१ किलोमीटर आहे. ८.८० किलोमीटरपर्यंतचे म्हणजेच ३५ टक्के जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. नवलाख उंब्रे ते कॅनबे (तळवडे) चौकापर्यंत १२५० मिली मीटर व्यासाची तर तेथून पुढे चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम वेगात सुरु आहे. पुढील दोन वर्षात काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. कोरोना महामारीमुळे प्रकल्प रखडला. आता या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

भामा आसखेड धरणाजवळ -२०० एमएलडीचे ‘जॅकवेल’ बांधणार भामा आसखेड धरणातील १६७ एमएलडी पाणी महापालिकेसाठी आरक्षित आहे. ते पाणी उचलण्यासाठी महापालिकेमार्पâत धरणाजवळ वाकी तर्फे वाडा येथील १.२० हेक्टर जागेवर २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अ‍ॅप्रोच ब्रीज, सबस्टेशन बांधण्यात येणार आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँक पर्यंत पाणी आणले जाईल आणि तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार आहे.

शून्य टक्के डिस्चार्ज
भामा आसखेड धरणातून शंभर एमएलडी पाणी उचलल्यानंतर हे पाणी चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्रामध्ये आणल्यानंतर आधुनिक टेव्नâॉलॉजीचा वापर करून हे पाणी शून्य टक्के ‘डिस्चार्ज’ होऊन संपूर्णत: वापरात येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी इरीगेशन फाउंटेन, पंपिंग स्टेशन, केमिकल लॅब, फ्लॅश मिक्सर, कॅरी फ्लोरेटर, फिल्टर वेल, ग्रिट वेल यांसारखी आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाणी शुद्ध करण्यात येणार आहे. धरणातून उचललेले संपूर्ण पाणी वापरासाठी उपलब्ध होईल यासाठीच स्काडा प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे हे संपूर्ण काम सेन्सर बेस आहे.