चिंचवड येथून अपहरण झालेल्या ‘माही’ची सुखरूप सुटका; आरोपी अटक

0
2289

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीमध्ये राहणाऱ्या बारा वर्षीय माही अवध जैन या मुलीची सुखरूप सुटका करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले असून तिला तिच्या घरच्यांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आले आहे. गुरूवारी दि. १५ दुपारी ४ च्या सुमारास माहीचे अपहरण करण्यात आले होते.

या प्रकरणी पोलिसांनी नितीन सत्यवान गजरमल (वय २५ रा. देवगाव ता. परांडा जि. उस्मानाबाद, सध्या रा. नेरे) त्याचा साथीदार जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय २१ रा. थेरगाव) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी दि. ४ च्या सुमारास शाळेतून घरी परतलेली माही शाळेच्या ड्रेसवरच क्वीन्स टाऊन सोसायटी समोरील मी मार्ट या दुकानात पेन आणण्यासाठी गेली होती. यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी माहीला जबरदस्ती त्यांच्या सिलव्हर रंगाच्या कारमध्ये बसवले. यादरम्यान माहीने मदतीसाठी आरडाओरडा केला. माहीचा आवाज ऐकून तेथील काही दुकानदार बाहेर आले. त्यांनी माहीच्या घरच्यांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी जलदगतीने तपास चक्रे फिरवत शहर परिसरातील टोलनाके, सीसीटीव्ही फूटेज, लॉज, हॉटेल तपासायला सुरूवात केली. यादरम्यान, आरोपींनी माहीच्या घरच्यांना खंडणीसाठी फोन केला. पोलिसांनी त्या नंबरचे लोकेशन ट्रॅक करून आरोपींना नेरे परिसरातून अटक केली आणि माहीची सुखरूप सुटका करत तिच्या घरच्यांकडे सुपूर्द केली.