लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेलादेखील पोटगीचा अधिकार

0
876

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेली महिला आपल्या जोडीदाराकडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत पोटगी मागू शकते, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.

केवळ शारीरिक, मानसिक नव्हे तर आर्थिक प्रकरणातही महिलेचा छळ केल्याप्रकरणी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलादेखील पोटगी मागू शकतात. जोडीदाराविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एका महिलेने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना मुलाला जन्म दिला. त्या महिलेला पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले. या आदेशाविरोधात जोडीदाराने झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने फौजदारी कायद्याअंतर्गत विवाह झालेल्या महिलांनाच पोटगी मिळण्याचा अधिकार असल्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.

सदर महिलेचा विवाह झाला नसला, तरी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. घरगुती हिंसाचारामध्ये आर्थिक प्रकरणांचाही समावेश आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.