खळबळजनक …त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे उघड

0
282

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेवर मोठे संकट आले आहे. महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट आले आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे सुरतला मुक्कामी होते, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पण, फडणवीस यांनी फोन उचलला नाही.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, ते काही परत आले नाही. त्याच दिवशी २१ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही.
असाच प्रकार २०१९ झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी बरेचदा फोन केले होते. पण त्यावेळे उद्धव ठाकरे यांनी फोन उचलले नव्हते. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली.
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर संजय राऊत यांनी मैदानात उतरून चांगलाच दांडपट्टा चालवला. राऊत यांनी शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आता ईडीची नोटीस आल्यामुळे अचानक राऊतांचा सूर बदलला आहे.
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहे. त्यांच्याकडे 106 आमदारांचं बळ आहे. इतका मोठा आमदारांचा गट महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नाही. हा गट महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो ही आमची कायम भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही क्षमता आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहे. पण त्यांनी आता जे डबकं झालं आहे, त्यांनी यात उतरू नये, एक मित्र म्हणून त्यांना सांगणं आहे. ज्या पद्धतीने डबकं तयार केलं आहे, डबक्यात बेडूक राहतात. फडणवीस जर त्यात उतरले तर भाजपची आणि पंतप्रधान मोदींची कमालीची अप्रतिष्ठा होईल, त्यात कुणी उडी मारणार नाही, असा सल्लाच राऊत यांनी फडणवीसांना दिला.
‘एकनाथ शिंदे हे आता ही येऊ शकतात. एकनाथ शिंदे हे अजूनही कार्यकारणीमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्षाचे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते आमचे मित्र आहे, सहकारी आहे. अयोध्येला ते माझ्यासोबत होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात व्यक्तिगत राग नाही, त्यांची व्यक्तिगत लढाई आहे, त्यांनी महाराष्ट्रात यावे, असं आवाहनही राऊत यांनी केलं.
‘गुवाहाटीमध्ये आमदार बसले आहे. त्या आमदारांना आता 11 जुलैपर्यंत मुक्काम वाढवावा लागेल. त्यांना झाडी, डोंगराचा आनंद घ्यावा लागेल. कोर्टाचा महत्त्वाचा आदेश आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत, आम्ही अजूनही त्यांना बंडखोर म्हणायला मानत नाही. त्यातील अनेक जण संपर्कात आहे. त्यांचे कुटुंबीय आमच्याशी संपर्क करत आहे. त्या लोकांना ज्या परिस्थितीत ठेवलं आहे, ती परत येतील असा आम्हाला विश्वास आहे’ असं राऊत म्हणाले.