को-या चेकवर सह्या घेऊन मित्राची चार लाखांची फसवणूक

0
480

दिघी, दि. १९ (पीसीबी) – मित्राला दारू पाजून त्याच्या को-या चेकवर आणि आरटीजीएस फॉर्मवर सह्या घेतल्या. त्याआधारे मित्राच्या खात्यातून चार लाख रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रांसफर करून घेत फसवणूक केली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) दिघी येथे घडली.

सचिन अरुण पोकळे (वय 37, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश वैजनाथ राठोड, बबन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), अमोल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश आणि फिर्यादी हे एकमेकांचे मित्र आहेत. मंगळवारी आरोपी गणेश याने फिर्यादी सचिन यांना फोन करून ‘टाटा मोटर्सचे काम आले आहे’ असे आमिष दाखवून पुणे-आळंदी रोडवरील दिघी येथील इमारतीमध्ये बोलावून घेतले. इमारतीच्या आठव्या मजल्यावरून नेऊन सचिन यान आरोपींनी बळजबरीने डांबून ठेऊन दारू पाजली.

सचिन यांच्या को-या चेकवर आणि आरटीजीएस फॉर्मवर जबरदस्तीने सह्या घेतल्या. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेतून गणेश याने स्वतःच्या नावावर चार लाख रुपये सचिन यांच्या खात्यातून ट्रांसफर करून घेतले. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी आरोपीने सचिन यांना दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.