कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी संघ, विहिप, बजरंगदलाचा पुढाकार

0
226

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी केवळ भोतिपोटी नातेवाईक पुढे येत नसल्याने महापालिका प्रशासनाची मोठी कुचंबना होत होती. हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत त्यातून मार्ग काढला आणि स्वतः कोरोनाचे किट घालून ही जबाबदारी स्विकारली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्ते करत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या १८ मृतदेहांवर या कार्यकर्त्यांनी विधीवत अंत्यसंस्कार केले. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या हिंदू नागरिकांचे हिंदू पद्धतीने अंतीम संस्कार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात रोज सरासरी १५ ते २० कोरोना बाधितांचा मृत्यू होतो. मृत व्यक्तीचे नातेवाईक आपल्याला कोरोनाची बाधा होईल म्हणून पुढे येत नाहीत. अनेक प्रकरणात मृतदेह स्विकरण्यासही कोणी येत नाही. महापालिकेनेच परस्पर अंत्यसंस्कार करावेत अशी अनेकांची अपेक्षा असते. त्यासाठी कर्मचारीही उपलब्ध नसल्याने काय करायचे असा गहन प्रश्न महापालिका प्रशासनापुढे होता.त्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले होते. प्रत्यक्षात २००० कार्यकर्त्यांनी नाव नोंदणी केली आणि अवघे २०-२५ कार्यकर्ते पुढे आले. त्यामुळे या कामात मोठी अडचण होत होती. अखेर रा.स्व.संघ, बजरंगदल, विहिप यांनी एकत्र येऊन हे अत्यंत कठीण आणि जोखमीचे काम स्विकारले आहे.

सध्या या अतिशय बिकट प्रसंगी शहरातील भोसरी, निगडी, चिंचवड या ठिकाणी असणाऱ्या विद्युत दाहिनी मध्ये कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती. मृतदेहाची विटंबना देखील काही अंशी होत होती, यावर उपाय म्हणून तरुण स्वयंसेवकांनी पुढे येऊन अंत्यसंस्कार विधी मध्ये आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सहकार्य करण्याचे निश्चित केले. गेल्या सहा दिवसांत 18 हून अधिक अंत्यसंस्कार या स्वयंसेवकांनी केलेले आहेत. त्यासाठी मृतदेहावर शाल टाकणे, त्याला हार अर्पण करणे, त्यासाठी शेवटची प्रार्थना करणे हे सर्व स्वयंसेवकच करतात. खबरदारी म्हणून सर्वजण कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून किट परिधान करतात. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या या कार्याची आता सर्वत्र वाहव्वा होते आहे.

कोरोना निवारण अभियान पिंपरी-चिंचवडचे अभियान प्रमुख सहकार्यवाह बाळासाहेब लोहकरे आणि कार्यवाह विलास लांडगे यांनी त्याबाबतची माहिती दिली. या अंत्यविधी करणाऱ्या मध्ये कुणाल साठे, अमर गावडे ,चंद्रशेखर अहिरराव, संजय शेळके हे कार्यकर्ते कार्यरत आहेत.