भाड्याच्या पैशांवरून अरेरावी करत रिक्षा चालकाने प्रवासी ग्राहकाचे फोडले डोके

0
392

काळेवाडी(पिंपरी), दि. १९ (पीसीबी) – भाड्याच्या पैशांवरून एका रिक्षा चालकाने प्रवासी ग्राहकासोबत अरेरावी केली. तसेच ग्राहकाच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 17) रात्री आठ वाजता तपकीरनगर, काळेवाडी येथे घडली

विशाल भास्कर शेंडगे (वय 28, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजीज आयुब शेख (रा. तपकीरनगर, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी विशाल त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत आरोपीच्या रिक्षातून आले. घराजवळ सोडल्यानंतर विशाल यांनी रिक्षा चालक आरोपी अजीज याला भाड्याचे 20 रुपये दिले. मात्र, अजीज याने आणखी 200 रुपये देण्याची मागणी केली. एवढे पैसे देण्यास विशाल यांनी नकार दिला असता अजीज याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून विशाल यांच्या डोक्यात मारला. यामध्ये विशाल जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.