कोरोना मुळे सोलापूरच्या माजी आमदाराचे निधन

0
339

सोलापूर, दि.१४(पीसीबी) : कोरोना संसर्ग झाल्यामुळे सोलापूर मध्ये एका माजी आमदारांचा बळी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार युनूस शेख यांचा शनिवारीच (13 जून) कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचारही सुरु झाले. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा कोरोना विरोधातील लढा अपयशी ठरला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सोलापूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

युनूस भाई शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार होते. शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जात. कालच त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सोलापूरसह राज्यात खळबळ उडाली आहे.

मागील अनेक दिवसांपासून सोलापूरमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. शनिवारी (13 जून) सोलापूर शहरात कोरोनाचे 41, तर ग्रामीण भागात 6 रुग्ण आढळले. तसेच शहरातील 6 जणांचा, तर ग्रामीण भागातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 1 हजार 659 वर पोहचली आहे. आतापर्यंत सोलापूरमध्ये 143 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असं असलं तरी आतापर्यंत 836 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोण होते युनूस शेख?
युनूस शेख 1969, 1975 आणि 1985 अशा तीन टर्मला सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. 1975 मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी युनूस शेख यांना महापौर पदासाठी संधी दिली. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. 1990 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र, 1998 मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या पश्‍चात 4 मुले, 3 मुली असा परिवार आहे.