स्वयंभू नेते प्रशांत शितोळे आरोप करताना पुरावे तरी द्या – जवाहर ढोरे

0
1153

– आमदार जगताप समर्थक ढोरे विरुध्द प्रशांत शितोळे आरोप प्रत्योराप सुरूच

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – भाजपचे चिंचवड मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यातील वाग्युध्द संपायचे नाव घेत नाही. दोन्ही बाजुंनी आरोप प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. कोरोना योध्यांमध्ये पत्रकारांचा समावेश करून राज्य सरकारने पत्रकारांना ५० लाख रुपयांचे संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. आपण त्यासंदर्भात मागणी केली होती, असा पत्रक आमदार जगताप यांनी काढले होते. राष्ट्रवादीचे शितोळे यांनी त्यावर परखड शब्दांत टीका करत हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला म्हणून आमदर जगताप यांच्यावर आगपाखड केली. त्याला तत्काळ प्रत्युत्तर म्हणून महापौर माई ढोरे यांचे चिरंजीव जवाहर ढोरे यांनी पत्रक काढून शितोळे यांची कुंडली मांडली. पुन्हा शितोळे यांनी थेट आमदार जगताप यांच्यावर प्रहार करत आजवरच्या राजकीय कटकारस्थानांचा पाढाच वाचला. हे पत्रक युध्द थांबले नाही, तर आमदार जगताप यांच्या वतीने ढोरे यांनी तिसरे पत्रक काढून शितोळे यांना सांगवीतून निवडून येण्याचे आव्हान दिले आहे.

प्रसिध्दीपत्रकात ढोरे म्हणतात, नगरसेवक असताना प्रत्येक गोष्टीत खाबुगिरी करून कुप्रसिद्धी मिळविलेल्या प्रशांत शितोळे यांना आमदार लक्ष्मण जगताप यांनी कायमचे घरी बसवून त्यांची दुकानदारीही कायमची बंद करून टाकली. त्यामुळे राजकीय द्वेषापोटी तिळपापड झालेल्या प्रशांत शितोळे यांची रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ उचलली जीभ लावली टाळ्याला अशी अवस्था झाली आहे. स्वतःला अति हुशार समजणाऱ्या प्रशांत शितोळे यांनी दुसऱ्यांवर आरोप करताना जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. आमदार जगताप यांनी कोणाच्या बहिणीचे प्रॉपर्टीचे हिस्से लिहून घेतले, हक्कसोडपत्र करून घेतले याचा एक तरी पुरावे त्यांनी द्यावा. उलट चोराच्या उलट्या बोंबा या म्हणी प्रमाणे प्रशांत शितोळे यांनी स्वतःच्या बहिणीचे हक्क सोडपत्र फसवणूक करून घेतले हे सगळा परिसर जाणतोच आहे. आमदारांनी गावकी-भावकीत कोणाची भांडणे लावली याचे एखादे तरी उदाहरण द्यावे. प्रशांत शितोळे यांच्या घरातील भावकीचे भांडण मिटवण्यासाठी कोणी गळ घातली व कोणी मिटवली हे सर्वांना चांगले माहिती आहे. भावकीबाबत एवढेच प्रेम असते तर स्वार्थ व द्वेषापोटी भावाच्या विरोधात उभे राहून भावालाच पाडण्याचे काम प्रशांत शितोळे यांनी केले नसते, अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य जवाहर ढोरे यांनी केली आहे.

ढोरे निवेदनात म्हणतात, “प्रत्येक गावकी-भावकीतील लोकांना समान न्याय देऊन गावकी-भावकीत चांगले वातावरण कसे राहील याची काळजी वारंवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतली आहे. पिंपळेगुरवमध्ये लोकवर्गणीतून मंदिर बांधले जात असताना महापालिकेच्या ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचा आरोप करणारे शितोळे यांनी त्यांचे पुरावे द्यावेत. गावचे मंदिर बांधताना ठेकेदाराकडून पैसे घ्यावे किंवा त्यांच्याकडून काम करून घ्यावे एवढी वाईट परिस्थिती पिंपळेगुरवमधील लोकांवर आजतागायत आलेली नाही. प्रशांत शितोळे हे शहराचे स्वयंभू नेते असल्यासारखे वागतात. स्वतःला फार हुशार राजकारणी समजतात, असे असेल तर एखाद्यावर आरोप करताना हवेत गोळ्या मारू नयेत. सांगवी भागातील नागरिकांनी महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहेच. पण त्यातून धडा न घेता शितोळे यांनी कायमच विरोधकांबाबत बिनकामाची बडबड करत राहण्याचा व फुशारक्या मारण्याचा उद्योग चालवला आहे. हा उद्योग असाच सुरू राहिला तर सांगवीतील नागरिकांना शितोळे यांच्याबाबत वेगळाच समज होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशांत शितोळे यांनी एकादा आरोप करताना ठोस पुरावे पण देऊन आपण फार मोठे नेते आहोत, याचा प्रत्यय जनतेला आणून द्यावा.

आजही आमदार साहेबांची वडिलोपार्जित ५० एकर जमीन पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. शहराच्या राजकारणात कार्यरत असताना सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणारे कुटुंब म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आमदारांनी पैसे घेतलेले किंवा भ्रष्टाचार केलेले एक तरी प्रकरण ठोस पुराव्यासहित दाखवावे. आमदार जगताप यांनी निवडणुकीचे तिकीट वाटप करताना कोणासोबत आर्थिक व्यवहार केले, कोणाबरोबर जॉईंट व्हेंचर केले, त्याचा एक तरी पुरावा शितोळे यांनी द्यावा. उलट शितोळे यांनी सुरू केलेल्या पेट्रोल पंपाच्या व्यवसायापूर्वी त्यांचा वैय्यक्तिक उद्योग किंवा व्यवसाय काय होता?, हे सर्वांना ठाऊक आहे. शितोळे हेच स्वतः म्हणायचे की आता आमच्या सरदारातले सर गेले फक्त दार शिल्लक राहिले आहे. असे असताना आपले उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ कसा बसतो ते जरा शितोळे यांनी डोळ्यात अंजन घालून पाहावे, असे डोरे यांनी म्हटले आहे.

आमदार जगताप यांनी गावकी-भावकीतील किती जणांना नगरसेवक केले. त्यांना स्थायी समिती सभापती, महापौरपदापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत केली याची स्वतः शितोळे यांच्यासह अनेक जिवंत उदाहरणे आहेत. प्रशांत शितोळे यांना नगरसेवक म्हणून निवडून आणून त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद कोणामुळे मिळाले ते सांगवी भागातील जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. शितोळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत उभा केलेला एक तरी कार्यकर्ता दाखवावा. प्रशांत शितोळे यांनी नाकाने वांगी सोलण्याचा प्रयत्न करू नये. आमदार जगताप यांनी निवडणुकीत तिकीट वाटप करताना कोणाशी आर्थिक व्यवहार केले, कोणाबरोबर जॉईंट व्हेंचर केले याचा एक तरी पुरावा प्रशांत शितोळे यांनी द्यावा. माझी आई महापौर माई ढोरे यांना वेळोवेळी निवडणुकीचे तिकीट तसेच महत्त्वाची पदे देताना आमदार जगताप यांनी कधी पैसे नाही घेतले. आमदार लक्ष्मण जगताप यांनी तिकीटासाठी कधी पक्ष सोडला नाही. दहा वर्ष अपक्ष असतानाही राष्ट्रवादीबरोबर राहिले. अनधिकृत बांधकामांना प्रश्न सोडविला नाही म्हणून तिकीट देत असताना सुद्धा पक्ष व तिकीट दोघांनाही नाकारले. सांगवीमध्ये व्हिजन २००५ नावाने जी कृष्णाई कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे रस्ते किंवा तत्सम कामे झाली त्यात प्रशांत शितोळे या महाशयांनी रिंग करून कशा प्रकारे मलिदा कमविला हे सर्वांना परिचित आहे. स्वतःच्या ऑफिसमध्ये बसून खोटे शिक्के मारून बोगस गुंठेवारी करून देणे, मध्यवर्गीय नागरिकांनी केलेली बांधकामे पाडण्याची भिती दाखवून त्यांना ब्लॅकमेल करून प्रशांत शितोळे व त्यांच्या बगलबच्च्यांनी मोबदल्याच्या नावाखाली काही सदनिका खंडणीपोटी लाटल्याचे उघड गुपित आहे, असा आरोप ढोरे यांनी केला आहे.

कोरोनाच्या संकटकाळात शासनाची किंवा महापालिकेची एक रुपयाची मदत न घेता आमदार जगताप यांनी नागरिकांना कशा प्रकारे मदत केली हे सर्व जिल्ह्यात ज्ञात आहे. कठीण परिस्थितीमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी सामाजिक दायित्व म्हणून नागरिकांची ज्या प्रकारे मदत केली, ते संपूर्ण शहर जाणून आहे. त्याचा त्यांनी कधी गवगवाही केला नाही. कारण लोकसेवा हे कार्य कर्तव्य म्हणून करायचे असते त्याचा ढोल वाजवायचा नसतो, ही त्यांची धारणा आहे. तरी देखील आमदार जगताप यांनी शासनाची किंवा महापालिकेची मदत घेतली असे वाटत असेलतर त्याचे प्रशांत शितोळे यांनी ठोस पुरावे द्यावेत. सांगवीतील महिला बचत गटांना मास्क पुरविण्याचे काम मिळाले. त्याचे पैसे या महिला बचत गटांना चेकद्वारे प्राप्त झाले आहेत. त्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला असेल तर सांगवी भागातील महिला बचत गटच याबाबत स्वतःहून प्रशांत शितोळे यांना सांगतील. सांगवी भागात सध्या कामे करीत असलेल्या ठेकेदारांची अडवणूक करून त्यांच्याकडून प्रशांत शितोळे कसे पैसे उकळतात याबाबत सांगवीकरांना वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. प्रशांत शितोळे यांच्याकडे आज जी माया आहे ती त्यांनी कशा प्रकारे कमविली आहे हे सुद्धा सांगवीकरांना चांगलेच माहिती आहे, असेही ढोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

आमदार जगताप यांनी शहरातील किती तरी महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे त्या महिलांनीच प्रशांत शितोळे यांना उत्तर दिलेले आहे आणि यापुढेही प्रत्येक निवडणुकीत उत्तर देतीलच. प्रशांत शितोळे यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ढोरे यांच्याशी भांडणे केली व ती भांडणेही आमदार लक्ष्मण जगताप यांनीच मिटवली हे सगळ्या शहराला माहिती आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी गावकी-भावकीत भांडणे लावली असा आरोप करण्यापूर्वी प्रशांत शितोळे यांनी थोडी मनाची तरी लाज बाळगावी. तसे त्यांनी केले असते तर सांगवी भागातील नागरिकांनी त्यांच्यावर थोडाफार विश्वास ठेवला असता. प्रशांत शितोळे यांनी स्वतःच्या चुलत बहिणीचे अधिकार बळजबरीने लिहून घेतले आहेत किंवा नाहीत हे सांगवीकरच सांगतील. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला अशी अवस्था झालेल्या प्रशांत शितोळे आणि त्यांच्यासारख्या इतर संधिसाधू मंडळींनी स्वतःचा स्वार्थ साधल्यावर आमदार लक्ष्मण जगताप यांना का सोडले आणि त्यानंतर ते राजकीयदृष्ट्या काळाच्या पडद्याआड का गेले याचे प्रशांत शितोळे यांनी नव्हे तर स्वतः आमदार लक्ष्मण जगताप यांनीच चिंतन करण्याची खरी गरज आहे. “ना घर का,ना घाट का” अशी स्थिती झाल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आरोप केल्यानेच चर्चेत राहता येते हा गैरसमज झालेल्या प्रशांत शितोळे यांच्यासारख्या नाठाळ व ढोंगी लोकांना यापुढे परत उत्तर देण्याची गरज नाही. किंबहुना सांगवी भागातील नागरिकांचीही तीच अपेक्षा आहे. आता सांगवी भागातील जनता आगामी महापालिका निवडणुकीतच प्रशांत शितोळे यांना पूर्वीपेक्षा आणखी जबरदस्त, खणखणीत आणि सणसणीत उत्तर देतील. घोडा मैदान दूर नाही. प्रशांत शितोळे यांनी तयार राहावे, असे आव्हानही जवाहर ढोरे यांनी दिले