काळेवाडी – रहाटणीत भटक्या श्वानांचा सुळसुळाट; महापालिकेचे दुर्लक्ष माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा आरोप

0
139

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – काळेवाडी – रहाटणी या दाट लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. झुंडीझुंडीने फिरणा-या या श्वानांपासून नागरिक आणि लहान मुलांना भीती निर्माण झाली आहे. मोकाट श्वानांनी आतापर्यंत तीन ते चार जणांना चावादेखील घेतल्याची माहिती आहे. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केल्या. मात्र, तरीही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की, काळेवाडी – रहाटणीच्या गल्लोगल्लीत मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. या श्वानांची दहशत स्थानिक नागरिकांमध्ये पसरली असून, सामान्य नागरिकांचे रस्त्यावर फिरणे अडचणीचे झाले आहे. 10 ते 12 बेवारस श्वानांचे टोळके प्रत्येक चौकात ठाण मांडून असतात. यामुळे परिसरातील नागरिकांना या श्वानांपासून मोठा धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक आपल्या घरातील शिळे अन्न घराबाहेर टाकत असल्यामुळे हे श्वान मोठ्या प्रमाणात तुटून पडतात. त्यामुळे त्यांची दहशत वाढली असून, जवळून जाणा-या – येणा-या पादचा-यांवर जोराने भुंकत असतात.

विशेषत: काळेवाडी फाटा ते मदर टेरेसा उड्डाणपूल बीआरटी लेनच्या दुतर्फा श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ज्योतिबा गार्डनजवळ तर झुंडीच्या झुंडी फिरत असतात. या उद्यानात मॉर्निंग वॉकला येणा-या ज्येष्ठांना, लहान मुलांना या श्वानांचा मोठा धोका आहे. या रस्त्यावरून चालणा-या महिला आणि लहान मुलांना कित्येकदा सैरावैरा पळून आपला जीव वाचवावा लागतो. याबाबत महापालिका प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही या कडे दुर्लक्ष केले जात आहे. लहान मुले या श्वानांच्या तावडीत सापडताच. त्यांचे हे श्वान चावा घेतात. अनेकदा या श्वानांनी पादचा-यांचा आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर धाव घेत पाठलाग केल्यामुळे अपघाताच्या घटना घडल्याने दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.

भटक्या श्वानांनी हैदोस घातला असताना महापालिकेने घेतलेली बघ्याची भूमिका संतापजनक आहे.उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. एका श्वानाच्या निर्बीजीकरणासाठी हजार रुपयांचा खर्च होतो. मागील दोन वर्षात महापालिकेने निर्बीजीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. तथापि, रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येने श्वान दिसतात. महापालिकेने भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही तापकीर यांनी केली आहे.