काम करण्यास मज्जाव करून आत्मदहनाची धमकी दिल्याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा

0
294

पिंपळे सौदागर, दि. १४ (पीसीबी) – कोहिनूर प्रमोटरच्या नावे असलेली जमीन बळकावण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत काम करण्यास मज्जाव करून कुटुंबासह आत्मदहन करण्याची धमकी दिल्याप्रकरणी बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी पिंपळे सौदागर येथे घडली.

गणेश काटे, सुरेश जयवंत काटे, संतोष जयवंत काटे, शशिकांत काटे, उमेश मेदनकर, कार्तिक बाळासाहेब काटे, किरण रामदास पडाळे, साई बाळासाहेब काटे, आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रामकिसन सखाराम पारटकर (वय 50, रा. रहाटणी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे कोहिनुर प्रमोटर्सच्या नावे असलेली जमीन बळकावण्याच्या उद्देशाने आरोपींनी मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमावला. तसेच शिवीगाळ करून काम करण्यास मज्जाव केला. गणेश काटे आणि इतरांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत ‘तुम्ही जर इथे काम कराल तर आम्ही याच ठिकाणी स्वतः पेटवून घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.