आशा भोसले यांनाही वीजबिलाचा शॉक, आठ हजाराचे बिल दोन लाख

0
369

मुंबई, दि. २ (पीसीबी) : पूर्ण राज्यातील वीज ग्राहक गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाढीव वीज बिलामुळे त्रस्त आहेत. आता प्रख्यात गायिका आशा भोसले यांनाही वीज बिलाचा शॉक बसला आहे. त्यांनी महावितरणकडे लेखी तक्रार केली. लोणावळ्यातील बंगल्याला दोन लाख आठ हजार रुपयांचे बिल आल्याचे तक्रार त्यांनी केली आहे. लॉकडाऊनचे कारण देत बहुसंख्य ग्राहकांना अशी मोघम बिले दिल्याने महावितरण विरोधात ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे.

आपल्याला जून महिन्याचे वीज बिल तब्बल 2 लाख 8 हजार 870 रुपये आल्याची तक्रार आशा भोसले यांनी ‘महावितरण’कडे केल्याचे वृत्त ‘इकोनॉमिक टाईम्स’ने दिले आहे. लोणावळ्यात असलेल्या आशा भोसले यांच्या बंगल्याचे हे बिल आहे. मात्र हे बिल प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन केल्याचा दावा ‘महावितरण’ने केला आहे.
आशा भोसले यांना मे महिन्याचे बिल 8 हजार 855 रुपये, तर एप्रिलचे बिल 8 हजार 996 रुपये इतके आले होते. बिलावरील नोंदीनुसार गेल्या जून महिन्यातही त्यांना 6 हजार 395 रुपये बिल आले होते. त्यामुळे हे वाढीव दोन लाख रुपये कसले, असा सवाल विचारला जात आहे.

“आशा भोसले यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत पुण्यातील वरिष्ठ अधिकारी स्वतः रीडिंग चेक करण्यासाठी बंगल्यात गेले होते. त्यावेळी मीटर योग्य असल्याचे दिसून आले, म्हणजेच बिलही योग्य आहे” असं ‘महाडिस्कॉम’च्या प्रवक्त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.
“योग्य तपासणी केली असता आशा भोसले यांचा बंगला बंद नव्हता आणि तिथे काही चित्रीकरणेही सुरु होती” असेही सांगण्यात आले. आशा भोसले यांची प्रतिक्रिया समजलेली नाही.