२३ जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे

0
69

पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत भाजप सोबत जाण्यास पसंती दिली. राज्य सरकारमध्ये सामील होत शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अनेक आमदार देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. त्यावर माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षातील नाराजी विषयी डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे.

डॉ. कोल्हे मध्यमांशी बोलताना म्हणाले की, खरं तर हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारच्या नाराजी असणे स्वाभाविक आहे. कारण जे नेतृत्व एकेकाळी २३ जागांचे निर्णय घेऊ शकत होते त्यांना अवघ्या आता चार जागा मिळतात. ही परिस्थिती लोकसभेला असेल तर विधानसभेला काय परिस्थिती असेल हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे.

त्याचबरोबर महायुतीची खूप मोठी घसरण होणार आहे. सर्व्हे मध्ये देखील ज्या चार जागा अजित दादांना भाजपने देऊ केल्या आहेत त्या चारही जागा मिळत नसल्याचे चित्र सर्व्हेमधून समोर आले आहे. दरम्यान ज्या जागा मिळाल्या आहेत त्या चार जागांवर एक घरात उमेदवारी द्यावी लागली तर एक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जागा लढवावी लागत आहे आणि उर्वरित दोन जागांवर उमेदवार आयात करावे लागले असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी अशी पक्षाच्या बाहेर येत असेल तर ही लोकसभा निवडणुक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूकीचे चित्र संभ्रमात असल्याच्या चर्चा देखील जोर धरू लागल्या आहेत.