कॅबिनेट मंत्री कमल वरूण यांचा करोनामुळे मृत्यू

0
226

नवी दिल्ली,दि.२(पीसीबी) – उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा करोनामुळे आज मृत्यू झाला आहे. कमल वरूण या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. शिवाय, या अगोदर त्या खासदार देखील राहिलेल्या होत्या.

सध्या त्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर लखनऊमधील एसजीपीजीआय येथे उपचार सुरू होते. १८ जुलै रोजी त्यांचे नमूने तपासण्यात आले होते, जे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. शिवाय, त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील करोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.

२०१७ मध्ये भाजपाने त्यांना कानपूरमधील घाटमापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या जागेवरून विजयी झालेल्या त्या भाजपाच्या पहिल्या उमेदवार होत्या. पक्षातील त्यांचे योगदान पाहून भाजपाकडून त्यांना २०१९ मध्ये कॅबिनेट मंत्री बनवले होते.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कमल वरूण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मी कमल वरूण यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्या करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते व एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या लोकप्रिय नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. कॅबिनेटचा भाग असताना त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम केले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.