तू केवळ राजेश भय्यांची नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची आई होतीस – यशोमती ठाकूर

0
209

मुंबई,दि.२(पीसीबी) – तू केवळ राजेश भय्यांची नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची आई होतीस, अशी प्रतिक्रिया महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या.

तू केवळ राजेश भय्यांची नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची आई होतीस. या जागतिक संकटाला धीरानं तोंड देणाऱ्या राजेश टोपेंची तू शक्ती होती. राजेश भय्याला लढण्याची शक्ती द्यायला तू आणखी जगायला हवं होतं. शारदाबाई टोपे यांच्या पवित्र आत्मास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !! अश्या शब्दात यशोमती ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले. कोरोना वॉरियर पोरका झाला, अशा शब्दात अनेकांनी राजेश टोपेंच्या आईला श्रद्धांजली वाहिली.