आमच्या हसण्याचा भारती पवारांच्या भाषणाशी काहीही संबंध नव्हता- रक्षा खडसे

0
517

मुंबई, दि. २० (पीसीबी) – भाजपच्या खासदार डॉ. भारती पवार लोकसभेत भाषण करत असताना खासदार प्रीतम मुंडे व रक्षा खडसे कुत्सितपणे हसत असल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ व त्यावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेवर खासदार रक्षा खडसे यांनी खुलासा केला आहे. ‘आमच्या हसण्याचा भारती पवारांच्या भाषणाशी काहीही संबंध नव्हता, असे खडसे यांनी म्हटले आहे.

१६ जुलै रोजीची लोकसभेतील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात भाजपच्या दिंडोरीच्या खासदार भारती पवार मराठीत भाषण करताना दिसत आहेत. त्याचवेळी त्यांच्यामागे बसलेल्या प्रीतम मुंडे व रक्षा खडसे हसताना दिसत आहेत. त्यावर कालपासून उलटसुलट चर्चा रंगली आहे. रक्षा खडसे यांनी एका निवेदनाद्वारे त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

‘लोकसभेत आमच्या हसण्याचा भारती पवारांच्या भाषणाशी संबंध नव्हता. उलट त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्या दिवशी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सभागृहात बसलो होतो. त्या कर्जमाफीबद्दल बोलल्या किंवा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला म्हणून आम्ही हसलो नव्हतो. सुज्ञ लोक यातून गैरअर्थ काढणार नाहीत. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा आम्हाला अभिमानच आहे,’ अस् त्यांनी म्हेल्य. ‘संसदेत हास्यविनोद होतच असतात. तो विषय गंभीरपणे घेण्याऐवजी माध्यमांनी चांगल्या कामांना प्रसिद्धी द्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.