धोनीची निवृत्ती इतक्यात नाही! पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा

0
502

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – भारताचा अव्वल क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवरुन सध्या बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. धोनीच्या निवृत्तीवरुन क्रिकेटप्रेमींमध्ये मोठया प्रमाणावर मतभिन्नता आहे. दरम्यान धोनीने आपण पुढचे दोन महिने उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यात धोनीचा संघात समावेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुढचे दोन महिने धोनी लष्करात सेवा बजावणार असल्याचे माहिती आहे.  धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. मागच्या काही दिवसांपासून धोनी लष्करात सेवा बजावणार असल्याची चर्चा आहे.

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची निवड समिती उद्या म्हणजेच रविवारी आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघनिवड करणार आहे. येत्या तीन ऑगस्टपासून तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. धोनीने बीसीसीआयला कळवल्यामुळे धोनी तात्काळ मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.