“आमचं ठरलयं कमळ सोडलयं, चंदूदादा परत जा…”

0
590

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघ लढवताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचं आता दिसत आहे. कारण, अगोदरच बाहेरचा उमेदवार नको स्थानिकच हवा अशी स्थानिक मतदारांनी भूमिका घेतलेली आहे. त्यात आता आमच ठरलय कमळ सोडलय, अस म्हणत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून देखील कोथरूडमधुन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांसमोर आता आणखी एक नवे आव्हान निर्माण झाले आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून जिल्हा अध्यक्ष मयुरेश अरगडे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून परत जा परत जा, चंदूदादा परत जा.., भाडोत्री उमेदवार चालणार नाही.., आमचं ठरलं कमळ सोडलं..अशी घोषणाबाजी केली.

तर, दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीने देखील खेळी खेळत मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना या मतदारसंघातुन महाआघाडीचा पाठींबा जाहीर केला आहे. परिणामी चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा काहीशी जड जाणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना तिकीट डावलून भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असतानाच कोथरुडमधून विरोध सुरु झाला होता. मात्र तरीही चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखलही केला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांना होत असलेला विरोध अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. स्थानिकांकडून विविध मार्गांनी भाजपाच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मतदारसंघात काही ठिकाणी फलक लावून, सोशल मीडियावर वेगेवेगळ्या मेसेजद्वारे नाराजी व्यक्त होतांना दिसत आहे.