सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शहरात सामाजिक उपक्रम

0
716

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – तळवडे येथील सरस्वती विश्व विद्यालय नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या विभागा मध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी नचिकेत बलाग्राम मध्ये २५ अनाथ मुलांना ब्लँकेटचे वाटप केले व त्यांनी निगडी बस स्थानक येथे स्वच्छ भारत विषयी पथनाट्य सादर केले. ७ वीच्या विद्यार्थ्यांनी सांगुर्डी गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व शांपू, साबण, ब्रश, टूथपेस्ट डेटॉल चे ५० मुलांना स्वच्छता कीटचे साहित्याचे वाटप केले.

इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी तुकारामनगर पिंपरी येथील वायसीएम हॉस्पीटलमध्ये २० लहान मुलांच्या विभागात वेगवेगळी खेळणी व खाऊचे वाटप केले. ९ वीच्या विद्यार्थ्यांनी तळवडे येथील अंगणवाडी क्र १ च्या भिंतीला रंग दिला व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. ६० विद्यार्थ्यांकडून चिंचवड स्टेशन भिंतीवर संदेश लिहून परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

१० वी च्या विद्यार्थ्यांनी आकुर्डी येथील संत बाबा मोनी साहेब आनंद आश्रमात फळे वाटप केले व काळभोर नगर येथील मदर टेरेसा वृध्दाश्रमात आजी-आजोबांच्या काळातील गाण्यावर नृत्य सादर करुन त्यांचे मनोरंजन केले व त्यांना फळांचे वाटप केले. ११ वीच्या विद्यार्थ्यांनी रुपीनगर तळवडे परिसरातील गरीब मुलांना खाऊचे वाटप केले. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी ब्रह्‍मदत्त विद्यालय निगडी शाळेच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले व त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या खेळात सहभागी झाले.

अशा प्रकारे मुलांनी समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या बरोबर आनंदी वातावरणात गांधी जयंती साजरी करुन मानवतेचा संदेश दिला. या विद्यार्थ्यांना शाळेचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, संचालिका स्मिता नायर- कुरुप, मुख्याध्यापिका क्षमा गरगे यांच्या मार्गदर्शन लाभले.