युतीत धुमशान; नितेश राणेंविरुद्ध शिवसेनेचे सावंत

0
421

सिंधुदुर्ग, दि. ४ (पीसीबी) –  शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही भाजपने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना पक्षात प्रवेश देऊन कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने उघडपणे नितेश यांच्या उमेदवारीला आव्हान देत नुकतेच राणेंची साथ सोडून शिवसेनेत आलेले सतीश सावंत यांना कणकवलीच्या आखाड्यात उतरवले आहे. सावंत यांना पक्षाने एबी फॉर्म दिला असून त्यांनी लगेचच शिवसेनेकडून नितेश यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. मात्र, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने राणेंच्या भाजपप्रवेशास कडाडून विरोध केला होता. त्यामुळे राणे व त्यांच्या कुटुंबीयांना वेटिंगवरच राहावे लागले होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी नितेश भाजपच्या तिकिटावरच कणकवलीतून लढणार आहे, असे सांगितले आणि वेगाने घडामोडी घडल्या. गुरुवारी नितेश यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आणि त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाले. नितेश यांनी भाजपच्या तिकिटावर कणकवलीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज लगेचच सिंधुदुर्गात राणे विरुद्ध शिवसेना लढाईचा नवा अंक सुरू झाला आहे.

शिवसेनेने सिंधुदुर्गात युतीधर्म बाजूला सारून नितेश यांच्याविरोधात सतीश सावंत यांना मैदानात उतरवले आहे. सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सावंत हे कणकवलीतून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले सावंत काही दिवसांपूर्वीच राणेंची साथ सोडून शिवसेनेत आले आहेत. नितेश यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला होता. सतीश सावंत यांना कणकवली ग्रामीण भागातून मोठे समर्थन आहे. जिल्हा परिषदेच्या हरकुळ बुद्रुक गटातून त्यांनी सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. या सगळ्या घडामोडी पाहता कणकवलीत तुल्यबळ लढत होईल अशी चिन्हे आहेत.