अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणार – उपमुख्यमंत्री

0
273

मुंबई,दि.३०(पीसीबी) – राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानाबद्दलची निश्चित माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अतिवृष्टीसोबतच काही भागातील धरणांचे पाणी सोडल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक संकट आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या शेतकरी वर्ग, लोकप्रतिनिधींकडून करण्यात येतात.राज्यसरकारकडे अनेकांच्या मागण्या प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी पीकविम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा सुरु आहे असेही पवार यांनी सांगितले.

राज्य सरकार संपूर्ण माहिती गोळा करत आहे. आकडे प्राप्त झाल्यानंतर सरकार निर्णय घेईल. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष पाहून मदत करण्याची आमची भूमिका आहे. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशासनाला योग्य ते निर्देश देत आहोत असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करताना शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अंदाज घेऊन मागणी केली जाते. मात्र किती मदत द्यायची हा सर्वस्वी केंद्राचा निर्णय आहे. काही काही राज्यांना केंद्राने न मागता स्वतःहून हजारो कोटींचे पॅकेज दिले होते. केंद्रसरकार हे संपुर्ण देशाचे आहे. त्यामुळे कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव न करता मदत दिली पाहिजे अशी मागणी त्यां नी या वेळी केली.