दिघीकर मोकाट जनावरांमुळे हैराण; रस्त्यांवर ठिय्या, वाहतुकीला अडथळा अन् अपघाताची भीती

bpcauthor
1 Min Read

दिघी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा त्रास वाढल्याने नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांसह मुख्य मार्गांवरही जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अचानक रस्त्यात येणाऱ्या जनावरांमुळे अपघाताचा धोकाही वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

परांडेनगरसह दिघीच्या विविध भागांत मोकाट जनावरे मोठ्या संख्येने फिरताना दिसत आहेत. अनेकदा ती रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. जनावरांच्या मलमूत्रामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीही पसरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दुचाकीस्वारांसाठी ही समस्या अधिक धोकादायक ठरत असून, अचानक जनावरे समोर आल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिक आणि वाहनचालकांना या समस्येतून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Share This Article