पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुनरीक्षणापूर्वी जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार होते. नव्या प्रारूप यादीत ही संख्या ६२ लाख १३ हजार ६९२ इतकी झाली असून, सुमारे २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची घट नोंदवण्यात आली आहे.
मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असणे, मृत मतदारांची नावे यादीत राहणे, कायमस्वरूपी स्थलांतर तसेच इतर कारणांमुळे ही नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
३१ ऑगस्टच्या प्रारूप यादीनुसार : पुरुष मतदार ३१ लाख ५१ हजार २९७, महिला मतदार ३० लाख ६२ हजार १२ तर इतर मतदार ३८३ आहेत.
प्रारूप मतदार यादीबाबत नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यावरील प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारूप मतदार यादीशी संबंधित सुमारे १३ लाख ३२ हजार ४४८ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. नाव यादीत नसल्यास नवीन नोंदणीसाठी अर्ज करता येईल, तर चुकीच्या नोंदींबाबतही संबंधित अर्जाद्वारे दुरुस्ती किंवा आक्षेप नोंदवता येणार आहे.

