- माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा
पुणे, दि. २७ – रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत.
भीमाशंकर जंगलात केवळ 34 हजार झाडांची नव्हे, तर 90 हजार झाडांची कत्तल होणार आहे, असा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. तसेच भीमाशंकरप्रमाणे राज्यात 23 प्रकल्पांसाठी 23 ठिकाणी लाखो झाडांची कत्तल होणार असल्याचा खळबळजनक दावाही विजय कुंभार यांनी केला आहे. विजय कुंभारांनी कागदपत्रे एक्सवर टाकून मोठा गौप्यस्फोट केला आहे. भीमाशंकरची वृक्षतोडच्या बदल्यात टोरंट कोयना धरण परिसरातील दोन गावांमध्ये वृक्ष लागवड करणार, असं म्हटलं आहे. पण प्रत्यक्षात अजून एक ही झाड लावलं नाही, उलट कंपनीने त्या बदल्यात 3 कोटी 84 लाख रुपये देत, वृक्ष लागवड करण्याऐवजी हात वर केलेत, असा दावा ही विजय कुंभारांनी केला.
कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका काय?
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर-1 परिसरात प्रस्तावित असलेला टॉरंट पॉवरचा पंप-स्टोरेज हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प हा सुमारे 3000 मेगावॅट क्षमतेचा आणि अंदाजे 13,500 कोटी रुपयांचा जलविद्युत व ऊर्जा साठवण प्रकल्प आहे. हा एक ‘पंप-स्टोरेज हायड्रोइलेक्ट्रिक’ प्रकल्प आहे, ज्याचा मुख्य उद्देश वीजनिर्मिती आणि अतिरिक्त ऊर्जा साठवण करणे हा आहे. या प्रकल्पाची क्षमता 3000 मेगावॅट असून प्रकल्पाचा अंदाजे खर्च 13,500 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर-1 परिसरात उभारला जात असून, कंपनीच्या दाव्यानुसार हे स्थल भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे.

