पिंपळे गुरवमध्ये महापालिका कार्यालयाजवळच अतिक्रमणाचा विळखा; ‘दिव्याखाली अंधार’ म्हणत नागरिकांचा सवाल

bpcauthor
1 Min Read

पिंपळे गुरवमधील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयालगत बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कार्यालयाच्या जवळच मोकळ्या जागेत व्यावसायिक वापर, पत्राशेड तसेच इतर बांधकामे झाल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

या परिसरात रुग्णालये, शासकीय व शैक्षणिक कार्यालये असल्याने नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र, रस्त्यालगत आणि मोकळ्या जागांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने कोंडी आणि अपघाताचा धोकाही वाढत आहे.

संबंधित जागेवरील बांधकामे अधिकृत आहेत की नाहीत, याची महापालिकेने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मंजूर नकाशा, बांधकाम परवानगी आणि प्रत्यक्ष बांधकाम यांची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.

महापालिकेचे अधिकारी याच परिसरात कार्यरत असताना कार्यालयाजवळच अतिक्रमण होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ नोटिसा देण्यापुरती कारवाई न करता रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Share This Article