16 कोटी रुपयाची 400 गुंतवणुकदाराची फसवणूक, सीए ला बेड्या

0
413

पुणे, दि. 27 (पीसीबी): गुंतवणूकदारांची 16 कोटी 16 लाख 95 हजार 470 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लेखा परीक्षकाला (सी.ए.) अटक केली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने 400 हुन अधिक ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे.

कैलास राधाकिसन मुंदडा (42, रा. रोहन कृतिका, आय/601, सिंहगड रोड, राजाराम पूलाजवळ, पुणे) असे अटक केलेल्या सीएचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी मुख्य आरोपी महेशकुमार भगवानदास लोहिया(31, रा. शिवसागर रेसिडेन्सी, फ्लॅट नं. ई 1/103, सनसिटी रोड, सारस्वत बँकेजवळ, आनंदनगर, सिंहगड रोड), सुनिल पुरूषोत्तम सोमानी (54, रा. सी 314, रविराज हेरिटेज, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे), गजानन महादेव माने (30, रा. त्रिवेणी बिल्डींग, पंचवटी नगर, परळी वैजनाथ, जि. बीड) या तिघांना अटक करण्यात आली होती.

याबाबत 51 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी महेशकुमार लोहिया आणि सुनिल सोमानी यांना पोलिसांनी दि. 25 सप्टेंबर 2019 मध्ये अटक केली होती तर आरोपी गजानन मानेला पोलिसांनी 3 ऑक्टोबर 2019 मध्ये अटक केली होती. सध्या आरोपी महेशकुमार लोहिया हा न्यायालयीन कोठडीत म्हणजेच जेलमध्ये आहे. आरोपी सुनिल सोमानी आणि गजानन माने हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. हा गुन्हा नोव्हेंबर 2016 ते सप्टेंबर 2019 दरम्यान शुक्रवार पेठेतील शिवकन्या अ‍ॅन्ड शिवकन्या इन्व्हेस्टमेंट (1360, भारत भवन, ऑफिस नं. बी-307) येथे घडला होता.

फिर्यादी यांनी लॉगटर्म गुंतवणुकीसाठी दिलेला 10 लाख रुपयांचा धनादेश महेशकुमार लोहिया याने त्याच्या बॅंक खात्यात जमा केला. फिर्यादींना खात्याची खोटी माहिती सांगून बनावट नफा-तोटा पत्रके तयार करून ती ई-मेलद्वारे पाठवून, खोटे संदेश पाठवून दिशाभूल केली. या प्रकरणात 400 हुन अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुंदडा याला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. गुंतवणूकदारांना फायदा होण्याचे आमिष दाखवून त्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे. मुख्य आरोपीकडून त्याने 1 कोटी 10 लाख 62 हजार 444 रुपये स्वीकारल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये निष्पन्न झाले आहे. मुंदडा व्यवसायाने सी. ए असून, गुन्ह्यातील काही गुंतवणूकदार त्याचे क्‍लाईंट आहेत.