४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; चाकण एमआयडीसीसह ३.५५ लाखांवर वीजग्राहक अंधारात

0
232

अदानी कंपनी विजपुरवठा पुर्ववत करण्यास अपयशी

पुणे, दि. १९ मे २०२३: शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (काल सायंकाळी ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब ४०० केव्हीमध्पये बिघाड झाल्याने पुणे शहरातील नगररोड विभाग, पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी भोसरी विभागातील व चाकण एमआयडीसीतील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. अनेक ठिकाणी सकाळपर्यंत विजपुरवठा खंडितच होता.

शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये काल सायंकाळी ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला. सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगाव शेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे १ लाख २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोबतच पिंपरी गाव, प्राधिकरण, आकुर्डी, थेरगाव, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, मामुर्डी, देहू, गाहुंजे परिसरातील एकूण ३ लाख ५५ हजारांवर ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यासोबतच चाकण एमआयडीसीमधील उच्च व लघुदाहबाच्या सुमारे ५ हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. तर १३२ केव्ही अतिउच्चदाब चाकण उपकेंद्रातून एका वीजवाहिनीद्वारे चाकण शहराचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे.

अदानी कंपनी विजपुरवठा पुर्ववत करण्यास अपयशी

या पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडून बिघाड दुरुस्त करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र विजपुरवठा पुर्ववत करण्यास ते अपयशी ठरले. अनेक ठिकाणी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरु झाला नव्हता.