२० कोटींची मालमत्ता असणाऱ्या पार्थ पवार यांच्यावर आई व भावाचे ९ कोटींचे कर्ज

0
649

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मावळ मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत स्वत;च्या मालमत्तेची माहिती दिली असून, त्यानुसार पार्थ यांच्याकडे २० कोटींहून अधिक रूपयांची एकूण मालमत्ता आहे. त्यामध्ये तीन कोटी ६९ लाख ५४ हजार १६३ रुपयांची जंगम, तर १६ कोटी  ४२ लाख ८५  हजार १७० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

पार्थ पवार वाणिज्य शाखेचे पदवीधर असून वकिलीचीही पदवी त्यांनी घेतली आहे. पार्थ अविवाहित असून  त्यांनी आपला व्यवसाय  शेती  असल्याचे  निवडणूक आयोगाला  सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.  त्यांच्या नावांवर एकही गुन्हा नोंद  नाही.

तसेच पार्थ यांच्यावर कुठल्या बँकेचे कर्ज नाही. मात्र, आपली आई सुनेत्रा यांना ७ कोटी १३ लाख १३ हजार २९५, तर लहान भाऊ जय याला २ कोटी २३ लाख असे एकूण ९ कोटी ३६ लाख १३ हजार २९५ रुपयांचे देणे  लागत आहे.

पार्थ यांच्याकडे स्थावर मालमत्तेत  बिगर शेतजमीन असलेली मालमत्ता अधिक आहे. तर जंगम मालमत्तेत ३ लाख ६७ हजार ११० रुपये रोकड  त्यांच्याजवळ  आहे.  बारामतीशिवाय  मुळशी तालुक्यातही त्यांची शेतजमीन आहे.