ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा ,नारायण राणे यांच्या वक्तव्यावर संजय राऊत संतापले

0
153

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीवाजा इशारा दिल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणे कठिण होईल असं वक्तव्य नारायण राणेंनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केलं होतं. या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी आक्षेप घेतलाय.

महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केलं. पवार यांनी विधानसभेत बहुमत चाचणीला उपस्थित राहून दाखवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याला राणेंनी धमकी असं म्हणत या वयामध्ये मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही असा टोला लागवला. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी कायम असतील, हे साऱ्या देशाला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पवार यांच्या विधानामुळे आता सत्तेचा लढा विधानसभेतच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, आघाडीचे नेते संघर्षांच्या भूमिकेत असल्याचे सूचित केले. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी पवारांना लक्ष्य केलं. “माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,” असं ट्विट राणेंनी केलं.
राणेंच्या याच वक्तव्यावर संजय राऊतांनी आक्षेप घेत फेसबुकवरुन एक पोस्ट केली असून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाला टॅग केलं आहे. “महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू. अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही,” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केलाय.